Friday, July 20, 2007

शुभ्र चांदण्याची ही सुगंधीत रात्र आहे
त्या देखण्या चंद्रकोरीची उणीव मात्र आहे

जाणतो मी आता आली आहेस इथेच तू
ही वेल रातराणीची निमित्त मात्र आहे


डाग म्हणुनी याला हिणवू दे कुणालाही
तो तीळ गालावरचा प्रेमास पात्र आहे

गाऊ तुझ्याविना सांग कसा 'यमन' मी
त्या तीव्र मध्यमेची ऊणीव मात्र आहे.



Datta
हे ईश्वरा, मला रस्त्यातला दगड बनवू नकोस
कुणास ठेच लागण्यासाठी...
त्या पेक्षा राहीन घराच्या भिंतीत
कुणा गरीबाच्या निवाऱ्यासाठी...

हे ईश्वरा, मला पाण्याचा थेंब बनवू नकोस
अळवावर मिरविण्यासाठी...
त्या पेक्षा कामी येऊदे
एखाद्याची तहान शमविण्यासाठी...

हे ईश्वरा, मला नुसतंच फुल बनवू नकोस
बागेत शोभण्यासाठी...
त्या पेक्षा येईन तुझ्या पायाशी
एखाद्याच्या इच्छापूर्तीसाठी...

हे ईश्वरा, मला नुसताच शब्द बनवू नकोस
कुणाची उणीदुणी काढण्यासाठी...
त्या पेक्षा राहीन एखाद्या अभंगात
तुझे गुण गाण्यासाठी...................


Datta